*हेड कॉ. विनोद बेलदार यांनी वाचविले गळफास घेणाऱ्या तरुणाचे प्राण*
पोलिस निरीक्षक,पोलिसांचे जनमानसात कौतुक !
-------------------------------
( रिपोर्टर - आबा सुर्यवंशी )
पाचोरा - (जळगांव ) पाचोरा शहराच्या शंभूनगर भागात राहणारा ४२ वर्षीय विवाहित तरुण व्यक्ती सचिन रामदास वाघ याने दि. १८ गुरुवार रोजी रात्री आठ ते साडे आठ वाजे सुमारास वैफल्यातून आणि वैयक्तिक कारणामुळे जीवाला कंटाळून फाशी घेण्याचा निर्णय घेतला. त्याने घरात मधून दरवाजा लावला आणि पाचोरा पोलीस हेल्पलाइन ११२ क्रमांक यावर फोन करून सांगितले, मी काही कारणास्तव आत्महत्या करीत आहे. हे ऐकताच ड्युटीवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार यांनी कुठलाही विलंब न लावता आपले वरिष्ठ अधिकारी पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना सदर घटनेची तात्काळ माहिती दिली असता पो. नि.अशोक पवार यांनी ताबडतोब विनोद बेलदार व पोलीस व्हॅन चालक समीर पाटील यांना लागलीच त्या घटना स्थळी जाण्यास सांगितले. हेड कॉन्स्टेबल विनोद बेलदार यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीचे घर गाठले. आतून दरवाजा लावलेला असल्यामुळे विनोद बेलदार यांनी आपली पूर्ण ताकदिनिशी दरवाजा तोडून घरात प्रवेश करून दोरीवर लटकलेल्या त्या व्यक्तीस खाली उतरवले. त्याच्यावर रुग्णालयात योग्य ते उपचार करून त्याला त्याची आई व बहिणीच्या स्वाधीन केले. सचिन वाघ याने जीवन संपवण्याच्या आतच त्याला हेड कॉन्स्टेबल विनोद बेलदार यांनी तत्परता दाखविल्याने त्याचा जीव वाचला. विनोद बेलदार यांनी सचिनला आत्महत्या करण्याच्या विचारांपासून योग्य ते समुपदेशन केले. तो पूर्णपणे बरा होईपर्यंत पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार, पो .का. समीर पाटील तिथेच थांबले होते. पोलिसांमध्ये माणुसकी असते हे यावरून सिद्ध होते. पोलीस निरीक्षक अशोक पवार व पोलीस कॉन्स्टेबल विनोद बेलदार ड्रायव्हर पोलीस समीर पाटील यांच्या महत्वपूर्ण भूमिकेमुळे त्या तरुणाला जीवदान तर मिळालेच सोबत एक वैवाहित कुटुंब उध्वस्त होण्या पासून वाचले हे विशेष .पोलिसांच्या कर्तव्यदक्ष वृत्ती कार्यतत्पर सेवा - भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment